Thursday, July 19, 2012

दारासिंग - एक अजेय कुस्तीवीर


          गाव धरमूचक, जिल्हा अमृतसर. या छोट्या गावात जन्मलेला एक मुलगा पुढे जाऊन कुस्ती विश्वातील चॅम्पीयन बनेल असा कोणी विचार सुध्दा केला नव्हता. 
          १९ नोव्हेंबर १९२८ साली या गावातील सौ. बलवन्त कौर व श्री सूरत सिंग यांच्या कुटुंबात एक सामान्य मुलाने जन्म घेतला आणि जगाच्या कुस्ती विश्वात एक नवीन इतिहासाला सुरुवात झाली. दारासिंग नाव असलेल्या ह्या मुलाचे लग्न त्याच्या घरच्यांनी लहान वयातच एका मोठ्या मुलीशी लावून दिले. आपला मुलगा लवकर तरुण व्हावा ह्यासाठी त्याची आई त्याला रोज बदाम लोणी, तसेच म्हशीचे दूध प्यायला देत होती. या मुळे हा बालक फक्त सतरा वर्षाच्या कुमारवयातच प्रद्यूम्न नावाच्या मुलाचा बाप बनला. दारासिंग यांना आणखीन एक छोटा भाऊ होता. त्याचे नाव सरदारासिंग. सर्व लोक त्याला रंधवा म्हणून ओळखायचे. या दोन्ही भावांना वेड होते पहिलवानीचे. गावात तसेच मेळ्यात कुस्त्यांमध्ये विजय मिळवत त्यांनी शहरातही आपल्या विजयाची पताका रोवली व आपल्या गावाचे नाव प्रकाशझोतात आणण्यास सुरुवात केली. 
          पुढे १९४७ ला दारासिंग सिंगापूर येथे गेले. कुस्तीचे वेड असलेले दारासिंग यांनी भारतीय प्रकारातील कुस्तीमध्ये मलेशियातील ‘चॅम्पीयन तारलोक सिंग’ याला हारवून कोलालंपूर येथील कुस्ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यांच्या विजयाची पताका सतत फडकत राहिली. अनेक देशांमध्ये आपल्या भारतीय कुस्तीने विजय मिळवत व्यावसायीक पहिलवान म्हणून त्यांची ख्याती दूरवर पसरली. विदेशात नावलौकीक करुन १९५२ ला दारासिंग भारतात परत आले आणि १९५४ मध्ये भारतीय कुस्तीमध्ये सुध्दा विजय मिळवला.
        यानंतर दारासिंग यांनी कॉमनवेल्थ खेळामध्ये अनेक देशांचा दौरा केला. यात त्यांनी जगतज्जेता किंगकाँग याला सुध्दा हरवले. यानंतर कॅनडा तसेच न्यूझिलँड येथील पहेलवानांनी त्यांना कुस्तीसाठी आव्हान केले. शेवटी १९५९ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पीयनशीप खेळामध्ये त्यांनी कॅनडाचा चॅम्पीयन असलेला जॉर्ज गार्डीयांका व न्यूझीलँडचा जॉन डिसिल्वा याला हरवून ही चॅम्पीयनशीप सुध्दा आपल्या नावावर केली. 
          या विश्वविजेत्याने एवढ्यावरच आपल्या विजयाचा रथ न थांबवता पुढे त्यांनी जीथे जीथे फ्रीस्टाईल कुस्ती खेळली जात होती त्या प्रत्येक देशात जाऊ़न कुस्तीचे सामने जिंकले. शेवटी अमेरीकेचा फ्रीस्टाईल कुस्तीचा जगज्जेता लाऊ थेज याला २९ मे १९६८ साली फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये धूळ चाटून ही चॅम्पीयनशीप सुध्दा आपल्या नावावर केली. या नंतर ते फ्रीस्टाईल कुस्तीचे विश्व विजेता बनले. पुढे १९८३ ला त्यांनी ‘अजेय पहीलवान’ या रुपात कुस्तीपासून सन्यास घेतला. 
      दारासिंग यांच्या जिवनातील सर्वात अविस्मरणीय कुस्ती स्पर्धांची यादी खूप मोठी आहे. यात पाकिस्तानी मझिद अक्रा, शान अली व तारीक अली (पाकिस्तान), प्रिन्स खुमाली (आफ्रिका चॅम्पीयन), ग्रेट रीकीडोझन (जपान), चॅम्पीयन बील रॉबीन्सन (युरोप), चॅम्पीयन पॅट्रॉक (इंग्लंड), डेवीड टेलर, डॅनी लॅन्च, मॅन माऊंटीन जॅक, कॅसवेल जॅक, जॉर्ज बर्गर्स, स्काय हाय, ली यांचा समावेश आहे. या सर्व पहिलवानांना त्यांच्या मायदेशी जाऊन धूळ चाटण्याचा विक्रम केवळ दारासिंग यांच्या नावावर आहे. 
        दारासिंग यांनी जवळपास ५०० पेक्षा जास्त कुस्ती स्पर्धा खेळल्या असून या सर्वांमध्ये ते अजेय राहिले. भारतातील अनेक माजी पंतप्रधान त्यांच्या कुस्तीला विशेष हजेरी लावत असत. यामध्ये श्री. पंडीत जवाहरलाल नेहरु, श्री. चौधरी चरण सिंग, श्री. मोरारजी देसाई, श्री. चंद्रशेखर, श्री. राजीव गांधी तसेच भारताचे माजी राष्ट्रपती श्री. गैनी झेल सिंग यांनी सुध्दा दारासिंग यांच्या कुस्तीस आवर्जून भेट दिली. त्यांच्या कुस्तीमधील लुझ थेस व किंग काँग सोबतची कुस्ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या शेवटच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान राजीव गांधींच्या हस्ते करण्यात आले होते. दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेत सुध्दा दारासिंग यांनी आपल्या विजयाची पताका कायम ठेवली. राष्ट्रपती श्री. गैनी झेल सिंग यांच्या हस्ते चषक घेऊन त्यांनी याच स्पर्धेबरोबरच कुस्ती विश्वातून अजेय निवृत्ती घेतली. 
          कुस्तीच्या मधील यशाबरोबच दारासिंग हे १९६० व १९७० च्या दशकातील एक्शन किंग म्हणून ओळखले जातात. चित्रपटांमध्ये हिरोने शर्ट काढण्याचा ट्रेंड दारासिंग यांनीच सुरू केला होता. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. त्यांच्या जवळपास १६ चित्रपटांमध्ये अभिनेत्री मुमताज हिने काम केले होते. नंतर १९८० ते १९९० च्या दशकात दारासिंग दूरचित्रवाहिनीकडे वळले. इथे त्यांनी महान हिंदू ग्रंथावर आधारीत रामायण या मालिकेत हनूमानाची भूमिका केली. या मालिकेतील हे पात्र लोकांच्या मनावर इतके बिंबले गेले की, यानंतर दारासिंग यांची ओळख म्हणजे, हनूमान हीच पडली. रामायण बरोबरच त्यांनी झी टीव्ही वरील हद करदी आपने या मालिकेत सुध्दा काम केले आहे. दारासिंग यांनी जवळपास १०० चित्रपटात काम केले असून त्यांचा नुकताच प्रदर्शित हिंदी चित्रपट म्हणजे जब वी मेट. व पंजाबी चित्रपट दिल अपना पंजाबी हा होता.
         दारासिंग जेव्हा आपल्या कुस्तीच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर होते त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या पसंतीची सुरजीत कौर नावाच्या मुलीसोबत दुसरे लग्न केले. आता त्यांच्या कुटुंबात तीन मुली व दोन मुले आहेत. 

हा लेख दैनिक मतच्या सर्व आवृत्तीला दि. 13 जुलै २०१२ रोजी प्रकाशित झाला आहे.   

ऑनलाईन हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
Click Here !

कृपया प्रतिक्रीया खाली असलेल्या "Add a comment" येथे नोंदवाव्यात!

No comments:

Post a Comment